हे थांबणार का?
खेड तालुक्यातील धामणे येथील सतरा वर्षाच्या मुलीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या मुलीचा मृतदेह आढळून आला असून, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही मुलगी शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता होती. धामणे येथील शेतात सोमवारी तिचा मृतदेह शेतात आढळून आला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिच्या आईसोबत शेतात काम करण्यास गेली होती. पिण्यासाठी पाणी घेऊन येते आणि वर्गातील मुलीला मोबाइल नंबर देण्यासाठी जाते, असे सांगून ती दुपारी साडेतीन वाजता शेतातून घरी निघून गेली. सायंकाळी साडेसहा वाजता तिची आई शेतातील काम आटोपून घरी आली. मात्र, मुलगी घरी नव्हती.
याबाबत आईने घराशेजारी राहणाऱ्या महिलांकडे विचारपूस केली. या मुलीला सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घरातून पुन्हा शेताकडे जात असताना काळूबाई मंदिराचे परिसरात पाहिले असल्याचे काहींनी सांगितले. आई आणि भावाने तिचा सर्वत्र शोध घेतला; परंतु ती कोठेच सापडली नाही. त्यानंतर चाकण पोलिसांत याबाबतची तक्रार देण्यात आली.