शाहू महाराजांचे प्राणीप्रेम
गजराज मोती ची शस्त्रक्रिया
छत्रपती शाहू महाराजांकडे जवळपास अडीचशे हत्ती होते. पैकी “गजराज मोती” हा महाराजांचा विशेष आवडता हत्ती होता. शिवाय तो अत्यंत भव्य व रुबाबदार होता, त्याचे शुभ्र वळणार दात दिलखेचक होते त्यामुळे तो छत्रपतींचा मानाच्या अंबारीचा हत्ती होता. गजराज मोती माजात आलेला असल्यामुळे राधानगरी येथे त्याला साठमारीच्या मैदानात उतरविण्यात आले. साठमारांनी व्यूहरचना केली व मोतीचा माज उतरविण्यासाठी ते पुढे सरसावले. खुद्द महाराज हा खेळ पाहण्यासाठी उपस्थित होते. साठमार रुमाल नाचवित मदमस्त मोतीला छेडू लागले. मोती प्रचंड चवताळला व एका साठमाराला हेरुन भयानक चित्कार करीत त्याच्या मागे धावू लागला. उपस्थितांच्या पोटात भितीने गोळा उठला. काहीतरी विपरीत घडणार असे महाराजांसह सर्वांनाच वाटू लागले. साठमार वायुवेगाने पुढे पळत होता व जोराचा चित्कार करीत चवताळलेला मोती त्याच्या मागे धावत होता. “मोतीने साठमाराला सोंडेत पकडले. गरगर फिरवून त्याला जमिनीवर आपटले आणि पायाखाली एक तंगडी धरुन सोंडेने दुसरी तंगडी फासकटली.” असे भेसूर चित्र उपस्थितांच्या मनपटलावर तरळले तोच साठमार चपळाईने समोरच्या दिंडीत घुसला. त्याचा मागून वायुवेगाने धावत येणारा मोती जोराने बुरुजावर आदळला त्यासरशी कडाड् कड असा मोठा आवाज झाला. त्यातच काळीज चिरुन जाणारा मोतीचा आर्त चित्कार पाठोपाठ उमटला. मोतीच्या तोंडातून रक्ताचा लोट वाहत होता. मोतीचा एक दात मोडला होता. दाताच्या आतील मांसल गोळा लोंबकळत होता. ते भयानक दृश्य पाहवत नव्हते. तोच गगनभेदी टाहो फुटला, “महाराज घात झाला. माझ्या मोतीचा दात तुटला.” असा आक्रोश करीत अंबादास माहूत मैदानात धावला. पिसाळलेल्या हत्तीसमोर जात असलेला भावनाविवश अंबादास पाहून महाराजांना धोक्याची जाणीव झाली. “अंबादास थांब. मोती पिसाळलाय, त्याच्यासमोर जाऊ नकोस.” असे म्हणतच महाराजांनीही मैदानात उडी ठोकली. तोपर्यंत अंबादास मोतीच्या सोंडेला बिलगून अश्रू ढाळीत उभा होता. प्रचंड पिसाळलेला तो भव्य गजराज मोतीसुद्धा सोंडेने अंबादासला वेढा घालून अश्रू ढाळीत शांतपणे उभा होता. तशाही स्थितीत हत्ती-माहूताचे प्रेम पाहून व आपल्या आवडत्या मोतीची भेसूर जखम पाहून महाराजांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. पण हत्ती पिसाळलेला होता. या स्थितीत तो काहीही करु शकतो हे जाणून महाराजांनी अंबादासला बाजूला घेतले व हत्तीला चिमटे लावून ठाणबंद केले. त्याच्या जखमेवर प्राथमिक उपचार केल्यानंतरच महाराजांनी मैदान सोडले.
दुसऱ्या दिवशी पहाटे महाराज व्हेटर्नरी सर्जन सावर्डेकर यांना घेऊन हत्तीठाणावर आले. डॉ. सावर्डेकरांनी मोतीला तपासले. तुटक्या दाताच्या पोकळीतील लोंबकळणारे मांस त्यांनी कापून टाकले. “तुटक्या दाताची वाढ होते काय?” महाराजांनी विचारले.
“नाही” डॉक्टरांनी सांगितले.
“दुसरा काही मार्ग?”
“दुसरा कुठलाच मार्ग नाही. दात मोडल्यामुळे दात्र्या पडल्या आहेत. त्या भारी खूपत असणार. तोंडातील जखम व खुपणाऱ्या दात्र्यांमुळे हत्ती सदा विव्हळत राहणार.”
“मग त्या दात्र्या तरी काढून टाका.” महाराज म्हणाले. त्यावर त्या काढता येणार नाहीत शिवाय यापुढे हत्तीवर इलाज करता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले.
दुसऱ्या दिवशी महाराज पिराजी मिस्त्रीला घेऊन आले. तेव्हा जखमेची पाहणी करुन पिराजी म्हणाला,”उरलेल्या दाताला जिथून दात्र्या पडल्या आहेत तेथून दात कापून टाकू.” महाराजांनी पिराजीच्या योजनेस संमती दिली. शस्त्रक्रियेसाठी हत्तीला सोनतळी कँपवर हलविण्यात आले. लोखंडही कापू शकतील आशा धारदार करवती पिराजीने आणल्या. मोतीला शांत ठेवण्याचे काम महाराजांनी अंबादास माहूताकडे सोपवले. मोतीचे पाय साखळदंडाने जखडून टाकले. हत्ती ठाणबंद झाला खरा पण सोंड मोकळीच होती. शस्त्रक्रियेसाठी जवळ जाणाऱ्याला तो सोंडेने उचलून फेकून देईल ही भीती होती. सोंड कशात तरी गुंतवून ठेवली पाहिजे यासाठी महाराजांनी एका नवीन साधनाचा शोध लावला. त्याचे तंत्र पिराजीस सांगितले व कुशल पिराजीने ते साधन तयार केले. “गळसाज” असे नाव देऊन ती साखळी हत्तीच्या गळ्यात घातली. लॉकेटप्रमाणे या साखळीत भक्कम काटेरी गोळा अडकविण्यात आला होता. हत्तीने हालचाल केली कि त्या गोळ्याचे अनकुचीदार काटे हत्तीच्या सोंडेला व पायाला टोचत. गोळ्याचे काटे टोचू नयेत म्हणून हत्ती साखळी सोंडेने उचलून धरी. अशाप्रकारे मोतीच्या सोंडेला गोळा उचलून धरण्याचे काम लागले !
अशाप्रकारे मोतीला ठाणबंद करुन पिराजी करवत घेऊन दात कापण्यासाठी मोतीच्या मानेखाली गेला. अंबादास हत्तीला गोंजारुन शांत ठेवू लागला पण पिराजीने दाताला करवत लावताच मोती बिथरला. हा माणूस आपल्याला इजा करणार असे वाटून तो पिराजीस पकडण्याचा प्रयत्न करु लागला. सोंड गुंतली असल्याने तो इकडेतिकडे झुकू लागला. त्यातूनही पिराजीने दाताला ककरवत लावली पण हत्तीने हिसडा दिल्यामुळे ती तुटली. तो दुसरी करवत लावणार तोच महाराज ओरडले, “पिराजी निघ बाहेर. मोती पायाखाली धरतोय तुला.” पिराजी पटकन हत्तीपासून दूर झाला. यानंतर हत्तीला झुलता येऊ नये म्हणून हत्तीच्या दोन्ही बाजूना बळकट दगडी भिंत बांधण्यात आली आणि पुन्हा एकदा शस्त्रक्रियेस सुरुवात झाली. आता मोतीला हालचाल करता येत नव्हती. पिराजीने दाताला करवत लावली. मोतीला राग आला व सोंडेला टोचणाऱ्या काट्यांची पर्वा न करता मस्तक फिरवू लागला.एकापाठोपाठ एक करवती मोडत होत्या. पिराजी आपल्या कामात मग्न होता. मोतीने दुसरीच युक्ती योजली. तो पुढचे पाय पुढे व मागचे पाय मागे पसरु लागला. त्याचे पोट खाली येत पिराजीला भिडले. पिराजी हत्तीखाली चेंगरणार तोच महाराजांनी पिराजीला ओढून बाहेर काढले.
महाराजांनी डाकवे मेस्त्रींना बोलावून दोन्ही बाजूंस हत्तीच्या पोटाला घासून भिंत बांधून घेतली. परत शस्त्रक्रिया सुरु झाली. मोतीला किंचितही हालता येईना. पाय पसरु लागताच पोट भिंतीला घासू लागले. त्यामुळे पायही पसरता येईनात. पिराजीने करवतीने काही दात्र्या कापल्या. हत्तीलाही कळून चुकले की हि माणसे आपल्याला इजा करणार नाहीत, तर आपल्या वेदना कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तोही समंजसपणे वागू लागला; मुळात मोती होताच समंजस ! हत्तीने सहकार्य करताच आठ दिवसांत पिराजीने खुबीदारपणे दात कापला. कापलेला दात तसाच राहू दिल्यास इन्फेक्शन होऊन हत्तीस इजा होईल म्हणून, एक चांदीचे टोपण तयार केले व दाताला भोके पाडून स्क्रूने आवळून गच्च बसविले. मोती यातनामुक्त झाला. शस्त्रक्रियेचा प्रयोग यशस्वी झाला. हा प्रयोग यशस्वी करणाऱ्या पिराजी मेस्त्री, डाकवे मेस्त्री व अंबादास माहूताला स्वतःच्या पंगतीला बसवून घेऊन महाराजांनी मेजवानी दिली.
मोतीने एक दात गमावला. त्याचबरोबर त्याच्या भोवती असलेले वैभवाचे वलयही विरुन गेले. अंबारीला, छबिना मिरवणुकीला आता तो घेतला जाणार नव्हता.
हे शल्य अंबादास माहूताला बेचैन करत होते. मोतीला पूर्वीचे वैभव प्राप्त झाले पाहिजे, ही महाराजांची उत्कट इच्छा होती. मोती होताच तसा विलोभनीय शरीरयष्टीचा व समंजस वृत्तीचा. एकदा महाराज मोतीजवळ उभे असता पिराजीला म्हणाले, “पिराजी, मोतीला दात बसवला पाहिजे. त्याशिवाय त्याला अंबारीसाठी घेता येणार नाही की मिरवणूकीसाठी बाहेर काढता येणार नाही.” तेव्हा पिराजी म्हणाला, ” बसवूया की महाराज. त्यात काय अवघड हाय ! भेंडीच्या लाकडाचा दात करतो. ते वजनाला हलकं, हत्तीच्या दाताच्या रंगाचं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला हिर नसतात. त्यामुळे दातासारखा दात करता येईल.” पिराजी कामाला लागला. अगदी तुटलेल्या दातासारखा हूबेहूब दात त्याने केला. त्याला पॉलिश केले. पाहणाऱ्याला तो खरा हस्तीदंत वाटायचा. हा लाकडी दात पिराजीने मोठ्या कौशल्याने चांदीच्या विळीच्या सहाय्याने मूळच्या दातास बेमालूम जोडला. दुसऱ्या दाताभोवतीही चांदीची विळी अडकवली. त्यामुळे पाहणाऱ्यास चांदीची विळी म्हणजे हत्तीचा अलंकार वाटे. दोन दातांचा डौलदार मोती पाहून महाराजांना अपरिमित आनंद झाला. अंबादास आनंदाने नाचू लागला आणि मोडक्या दाताच्या ठिकाणी आलेला दात पाहून मोतीसुद्धा आनंदित झाला. पुढे मोतीचा छबिना मिरवणुकीचा मानही अबाधित राहिला.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.