देशव्यापी संघर्षाची सुरुवात साताऱ्यातूनच : खा. शरद पवार

0
देशव्यापी संघर्षाची सुरुवात साताऱ्यातूनच : खा. शरद पवार

सातारा : सामान्यांचा विकास करण्याऐवजी सध्या सांप्रदायिकतेला पाठबळ दिले जात आहे. शेतकरी, उपेक्षित घटक व स्त्रियांच्या विकासासाठी सत्तेचा वापर केला जात नाही. या सांप्रदायिक विचारांविरोधात बहुजन विचारसरणीच्या सर्वांची संघटना करायला पाहिजे. हे काम संघर्षमय आहे. या मातीतील क्रांतिकारक बीजे व सर्व समाज घटकांना सोबत नेण्याचा यशवंत विचारच तो लढा देऊ शकतात. त्यामुळे सातारा जिल्ह्याने या बदलाविरोधातील लढ्याचे नेतृत्व करावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी केले. साताऱ्यातील ही लाट संपूर्ण देशात जाईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सातारा जिल्ह्याच्या वतीने येथील जिल्हा परिषद मैदानावर श्री. पवार यांचा गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते.

श्री. पवार म्हणाले, “”साताऱ्याच्या मातीत क्रांतीची बीजे आहेत. स्वराज्यनिर्मिती असो किंवा ब्रिटिशांविरुद्धचा स्वातंत्र्यलढा. या प्रत्येकात या मातीचे सुपुत्र अग्रेसर होते. स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावणारे यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील याच मातीतले. सर्वसामान्यांच्या घरात शिक्षणाची गंगा जायला पाहिजे, यासाठी शिक्षणाचा वटवृक्ष निर्माण करणारे कर्मवीर भाऊराव पाटील इथलेच. प्रत्येक काळात हा जिल्हा सर्व सामान्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उभा ठाकला. बहुजन समाजातील सर्वांना सोबत घेतले पाहिजे, समाजातील शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे, त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले पाहिजेत, त्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून मिळालेल्या सत्तेचा वापर केला गेला पाहिजे, हा यशवंत विचार याच जिल्ह्याने देशाला दिला. कर्तृत्वाची खाण असलेला हा जिल्हा आहे. माणूस कुठेही गेला तरी मूळ जिथलं, तिथला स्वभाव व संस्कार हे कधीच जात नाहीत. आयुष्यात मला मिळालेले यश असो किंवा अविरत संघर्षातही न डगमगता उभे राहण्याच्या स्वभावाच्या मागे याच मातीचे बळ आहे.”

ते म्हणाले, “”सध्या सर्वसामान्य माणसांत प्रचंड अस्वस्थता आहे. तथाकथित गोरक्षकांच्या झुंडी धुमाकूळ घालत आहेत. सांप्रदायिक विचाराला पाठबळ दिले जात आहे. महागाई व मंदीचे सावट देशावर आहे. शेतीची अर्थव्यवस्था संकटात आहे; पण शासनकर्त्यांना त्याची चिंता नाही. विकास-विकास घोष होतोय; पण कुणाचा? शेवटच्या घटकाच्या विकासाचा विचार होत नाही. काळ्या आईच्या लेकारांसाठी, समाजातील उपेक्षित घटक व स्त्रियांच्या सक्षमतेसाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी सत्तेतून मिळालेल्या अधिकारांचा वापर केला पहिजे, या यशवंत विचारांची जपणूक होताना दिसत नाही. ही सर्व आव्हानात्मक परिस्थिती आहे. सांप्रदायिक विचारांचा बीमोड करण्यासाठी बहुजन विचारसरणीच्या देशातील सर्वांची संघटना उभी करणे आवश्‍यक आहे. ही वाट संघर्षमय आहे.”

सातारा जिल्ह्याने कोणत्याही परिस्थितीत कधीही सांप्रदायिक विचारांना साथ दिली नाही. कोणत्याही संघर्षाला न डगमगण्याचा गुण इथल्या मातीने प्रत्येकात भरला आहे. त्यामुळे या जिल्ह्याने या संघटनेचे नेतृत्व करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

सातारकरांचा आणि माझा एक वेगळाच ऋणानुबंध आहे. सातारा जिल्ह्याने नेहमीच मला भरभरून प्रेम दिले. स्वातंत्र्याचे आंदोलन, सत्यशोधक आणि शैक्षणिक चळवळीत सातारा जिल्हा नेहमीच अग्रसेर राहिला. सांप्रदायिक विचारांना या जिल्ह्याने कधीच थारा दिला नाही. सत्यशोधक समाजाने एक पिढी तयार केली. साताऱ्यातील लोक या चळवळीत अग्रसर होते. गरीबांच्या मुलांना शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या कर्मवीर भाऊरावांचा हा भाग आहे. असे  श्री. पवार म्हणाले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांची आज जयंती आहे. तसेच त्यांचे हे जन्मशताब्दी वर्षसुद्धा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. शंकरराव चव्हाण यांच्या इतकेच उत्तुंग असे वसंतदादा यांचे कार्य आहे.
आपले राज्य हे महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, कर्मवीरांच्या विचारांचे राज्य आहे. पण आज देशात काय परिस्थिती आहे? गाय घेऊन जाणाऱ्यांची हत्या केली जाते. गोरक्षकांची संख्या वाढत आहे. सांप्रदायिक विचार दिवसेंदिवस वाढत आहेत. सातारा जिल्ह्याने अशा विचारांचा कधीच पुरस्कार केला नाही.

आज राज्यावर दुहेरी संकट आहे. राज्याची शेती उद्ध्वस्त होत चालली आहे. उद्योग बंद पडत चालले आहेत. वर्तमान राज्यकर्त्यांना याचे काहीच पडले नाही. याबाबत आपण सर्वांनी विचार करायला हवा. आपण संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. हे साताऱ्यातील लोकच करू शकतात.

विकासाचा अर्थ म्हणजे काही मूठभर लोकांचा विकास नाही, सामान्य माणसांची, शेवटपर्यंतच्या माणसांच्या हिताची जपणूक झाली पाहिजे. ते होताना दिसत नाही. आज संघर्ष करण्याची गरज आहे. परिस्थिती आव्हानात्मक आहे. या परिस्थितीला सामोरे जायला हवे. आपण प्रत्यन केले तर बदल घडल्याशिवाय राहणार नाही. असे  मत यावेळी श्री. पवार यांनी मांडले .

जाणता राजा गहिवरला 
शरद पवार यांची अनेक भाषणे आजवर जिल्ह्याने अनुभवली. अनेक घडामोडींना खंबीरपणे सामोरे जाणारे शरद पवार आज पहिल्यांदा भाषणात हेलावलेले दिसले. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, कोणत्याही परिस्थितीत सातारा जिल्ह्याने त्यांना खंबीरपणे साथ दिली. त्यांचा सत्कार स्वीकारल्यानंतर बोलायला उभे राहिलेले पवार पहिल्यांदाच भावूक झालेले दिसले. भाग्य लागते अशी माणसे मिळायला. प्रत्येक वेळी मनापासून साथ देणारा जिल्हा आहे हा. तुम्ही केलेल्या सत्काराबद्दल, तुमच्याबद्दल काय बोलू? क्षणभर त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आवाजही भरून आला होता. जिल्ह्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्या या जाणत्या राजाचा कातळ आवाज ऐकूण उपस्थितांचीही मनेही हेलावली.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.