ज्ञानकोविंद शंभूराजे आणि छत्रपती परिवार !

0
ज्ञानकोविंद शंभूराजे आणि छत्रपती परिवार !

ज्ञानकोविंद शंभूराजे आणि छत्रपती परिवार !

शस्त्रास्त्र-शास्त्र पारंगत असं हे भोसले कुटुंब, याचा “शस्त्रास्त्र” चेहराच कायम जगासमोर मांडला गेला आणि याच मुळं शहाजी महाराजांपासून संभाजी राजांपर्यंत सगळ्यांचा “शास्त्र” व्यासंग झाकोळून गेलेला.

छत्रपती परिवार

म्हणूनच या चित्रात तोच प्रसंग मांडलाय,

मध्यवर्ती बसले आहेत ते संभाजी महाराज, त्यांचा हातात त्यांनी स्वतः लिहीलेला ग्रंथ आहे “बुधभूषण”. रायगडाच्या त्यांच्या ग्रंथालयात हा तेजपुंज युवराज घरच्यांसमोर स्वरचित ग्रंथाचं वाचन करतोय. चेहऱ्यावरचा करारी बाणा आणि विद्वतेची झाक सगळं सांगून जातेय. केवढा मंगलमय सोहळा असेल हा.

संभाजी महाराजांच्या उजव्या हाताला छत्रपती शिवराय बसले आहेत, चेहऱ्यावरचा कौतुक झाकता झाकेना महाराजांच्या. स्वराज्य ( साम्राज्य नाही) योग्य हातातच जाणार याची जाण अश्याच प्रसंगातून होत असेल थोरल्या राजांना. बापाच्या हाताला घट्ट पकडलेले चिमुरडे हात आहेत राजारामांचे. चार वर्षाच्या छोट्या राजारामांना थोरल्या दादाचं मोठं कौतुक, संभाजी दादाच्या पाठी सह्याद्रीच्या रांगडेपणाचं आणि शिवरायांच्या बाणेदारपणाचं बाळकडू राजारामांना आपसूक मिळतं होतं.

संभाजी महाराजांच्या डाव्या हाताला रयत माऊली जिजाऊ बसलीय. आयुष्यभर त्यागाची परिसीमा गाठलेल्या या साध्वीला आयुष्याच्या उतारवयात नातवाचा हा शास्त्रार्थ केवढा आनंद देऊन गेला असेल. त्यांच्या बाजूला बिलगून त्यांचा हात हातात घेऊन बसलेल्या आहेत त्या राजे भोसले घराण्याच्या सुनबाई, येसूराणी सरकार. जेमतेम १०-११ वर्षाचं वय त्यांचं, आऊसाहेबांच्या मायेचा उबदार स्पर्श आणि धन्याचं ग्रंथवाचन, भरून पावली असेल ती पोरं.

संभाजी राजांच्या आणि शिवरायांच्या मागे थांबून हा सगळं कौतुक सोहळा पाहत थांबल्या आहेत त्या शिवराज्ञी सोयराराणी, सईराणी सरकारांच्या अकाली मृत्यूनंतर संभाजी राजांचा आऊसाहेबांसंगती तळहाताच्या फोडाप्रमाणं सांभाळ केला तो याच माउलीनं. स्वतःचा मुलगा जेंव्हा ग्रंथकर्ता होतो, सर्वाना चौफेर थांबवून ग्रंथवाचन करतो. त्यावेळचा आनंद मांडायचा तो कोणत्या शब्दात? शब्दानांही पांगळं व्हायला होतं अश्यावेळी.

शंभूराजे आणि आऊसाहेबांच्या मागे थांबून या कौतुकसोहळ्याची साक्ष बनल्या आहेत त्या शिवछत्रपतींच्या राजकुमारी, राजकुवंर राणीसरकार आणि अंबिकाराणी सरकार. शिवरायांच्या मुली माझ्यामते पहिल्यांदाच एखाद्या चित्रांद्वारे जगासमोर आल्या असाव्यात. स्वतःच्या ज्या भावाला मांडीवर जोजावलं, ज्याच्या गालाला तीट लावून ज्याला कमरेवर घेऊन गडभर फिरवलं. तोच भाऊराया आज ग्रंथकर्ता झालाय याचा आभाळाएवढा आनंद कोणत्या पदराला संचित म्हणून बांधायचा? डोळ्यातले आनंदाश्रू थांबवायचे ते कोणती शपथ घालून?

या कौतुक सोहळ्याचे सच्चे जनक, शहाजी महाराज याकाळी हयात नाहीत. अश्या आनंदाच्या क्षणी त्यांची आठवण न होते तरंच नवल. बंगरुळ मुक्कामी त्यांनीच शिवरायांना शस्त्रविद्येपासून शास्त्रविद्यापर्यंत स्वतःच्या देखरेखीखाली पारंगत करून स्वराज्याची खूणगाठ शिवरायांना बांधून दिली. हा प्रसंग त्याचाच परिपाक. या भोसले कुटुंबाच्या पाठीशी चित्ररूपात महाबाहू शहाजी महाराजही दाखवले आहेत. त्यांना विसरण्याची चूक यापुढे करणे नाही.

चित्राचं स्थळ:- रायगडावरचं संभाजी महाराजांचं ग्रंथालय

चित्राचं साधारण वर्ष:- १६७४ चा पूर्वार्ध (राज्याभिषेकाच्या काही महिने आधी.)

चित्रातल्या व्यक्तिरेखा:- शंभूराजे (मध्यवर्ती), संभाजी महाराजांच्या उजव्या हाताच्या मंचकावर दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी राजे, त्यांच्या हाताला कवटाळून थांबलेले राजाराम महाराज, संभाजी महाराजांच्या डाव्या हाताच्या मंचकावर रयत माऊली जिजाऊ, त्यांचा हात पकडून बसलेल्या येसुराणी सरकार, संभाजी राजांच्या आणि शिवरायांच्या मागे थांबलेल्या शिवराज्ञी सोयराराणी, संभाजी महाराज आणि आऊसाहेबांच्या मागे थांबल्या आहेत त्या शिवछत्रपतींच्या राजकुमारी, राजकुवंर राणीसरकार आणि अंबिकाराणी सरकार.

चित्रकार:- दिनेश काची

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

संभाजीपुत्र थोरले शाहु महाराज यांचा इतिहास…?

म्हणून औरंगजेबाने महाराजा जयसिंग ह्यांना शिवाजी महाराजांचे पारीपत्य करण्यासाठी मोठे सैन्य देऊन पाठविले ?

आपल्या समाजाला न कळलेले संभाजी महाराज…?

सुरत नंतर शिवाजी महाराजांनी लुटले हे शहर ?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.