छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम सरदार, खरोखर शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी होते का?

0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम सरदार, खरोखर शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी होते का?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम सरदार

छत्रपती शिवाजी महाराज की……. म्हणल्यावर सर्व जातीतील बांधवांच्या तोंडी एकच आवाज येतो…..जय…….
छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती, त्यांचे सामर्थ्य, त्याचे आचरण लोकांच्या ठायी ठायी बसलेय. शिवाजी महाराजांची ओळख म्हणजे गोब्राह्मण प्रतिपालक तर काहींनी मुस्लीम सत्तेला तोंड देणारा हिंदु राजा अशी करून टाकली आहे.

आज आपण अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे, सिंहासनावर आरूढ झालेले पुतळे, अरबी समुद्रात सर्वात उंच असे स्मारक उभारून शिवाजी महाराजांचे कार्य जगाच्या कानाकोपर्यात पोहचवण्याचे काम करत आहोत. पण आपण जगासमोर कोणत्या शिवाजी महाराजांना दाखवणार आहोत? मुस्लिमविरोधी की सहिष्णू?

‘लोक कल्याणकारी राजा‘, ‘प्रजाहितदक्ष राजा‘ स्वधर्माचे राज्य यावे म्हणून लढला की स्वकीयांचे राज्य यावे म्हणून लढला हे समजवायला आपला इतिहास कमी पडला.

छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी होते, असा एक मतप्रवाह लोकांच्यात बिंबवला जातो आहे. त्यावरून कित्येक वेळेस जातीय दंगली उसळल्या, जातीय हिंसाचार घडला. यावरून आपण काय साध्य करणार आहोत कोणास ठाऊक. काही वर्षापूर्वी प्रतापगडावरील अफजलखानाची कबर तोडण्याचा प्रयत्न झाला होता, नंतर जेव्हा त्यांना समजले की ती कबर खुद्द शिवाजी महाराज यांनी बांधली आहे तेव्हा कुठे तेथील तणाव निवळला.

शिवाजी महाराज यांनी मुघल, आदिलशाही याच्याबरोबर लढत आपले स्वराज्य स्थापन केले. पण या लढाईत मुघल, आदिलशाह, आणि खुद्द शिवाजी महाराज यांच्या सरदारांची कधी कोणी जात पाहिली आहे का?
शिवाजी सर्व धर्मांच्या लोकांचा सन्मान करायचे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची धोरणं, लष्करं आणि प्रशासकीय नियुक्त्यांमध्ये मुस्लीम सरदारांना स्थान यावरून महाराजांचे सर्वधर्म धोरण दिसून येते.

तर चला पाहूयात
शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम सरदार

शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी सुफी संत शाह शरीफ यांच्या सन्मानाप्रित्यर्थ आपल्या मुलांची नावं शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली होती. शिवाजी महाराज यांनी आपल्या आयुष्यात मुघल आणि आदिलशाही सरदारांविरुध्द अनेक लढे दिले. त्यातील बहुतेक सरदार हे हिंदु होते.

महत्वाचे म्हणजे औरंगजेबच्या सेनेचं नेतृत्व करत राजा जयसिंह एक राजपूत याने स्वराज्यावर आक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेले किल्ले तहाखाली जप्त केले होते. राजा जयसिंग औरंगजेबच्या दरबारातील मुख्य सरदारांपैकी एक उच्च पदस्थ होता.

शिवाजी महाराजांनी आपल्या प्रशासनात मानवता हे एकमेव धोरण अवलंबले होते ज्यात धर्माला कोणतेही स्थान नव्हते. त्यांच्या सैन्यात समावेशासाठी कोणत्याही धर्माची अट नव्हती म्हणूनच शिवरायांच्या सैन्यातील बहुतांश अधिकारी आणि सैनिक हे मुस्लीम धर्मीय होते.

Father of Indian Navy भारतीय नौसेनेचे जन्मदाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौसेनेची धुरा दर्यासारंग या मुस्लीम सरदाराच्या हाती होती. दर्यासारंग यांनी इंग्रज नौसेनेला अनेकवेळा पराभवाची चव दाखवत आपल्या शौर्याने स्वराज्य वाढीस हातभार लावला होता. शिवरायांच्या नौसेनेत बहुसंख्य प्रमाणात सिद्दी मुस्लीम आणि मच्छिमार लोक होते. ज्यांना समुद्राच्या आडवळणाचा अनुभव होता.

शिवाजी महाराज हे कायम आपले सैन्य प्रगतशील बनवण्यासाठी तत्पर होते त्यासाठी त्यांनी शस्त्रागाराची निर्मिती करत त्याची कमान इब्राहिम खान याच्या हातात दिली होती. महाराजांच्या शस्त्रागारातील बहुसंख्य सैनिक हे मुस्लीम धर्मातील होते.

शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका कोण विसरेल, जेव्हा शिवाजी महाराज आग्र्यात नजरकैदेत होते, त्यांची सेवा करणाऱ्या मदारी मेहतर या मुस्लीम शिपायाने शिवरायांना तिथून पलायन करण्यास मदत केली होती हे कोण विसरेल. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याची ख्याती तर आपण सर्वजण जाणतोच. शिवरायांनी गुप्तहेर खात्याच्या मदतीवरच अनेक मोहिमांमध्ये यश संपादन केले होते. त्यात गुप्तहेर प्रकरणांचे सचिव हे मुस्लीम मौलाना हैदर अली हे होते. गुप्तहेर रुस्तमे जमाने यांनी शिवाजी महाराजांना अफजलखानाचा दगाबाजी करण्याचा मनसुबा असल्याचे आधीच कळवले होते. त्यावरूनच अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणे महाराजांना शक्य झाले. सुरत लुटीच्या अगोदर शिवरायांच्या गुप्तहेरांनी अगोदर तेथील धनवान, मस्तीखोर सरदार, जमीनदार, सावकार यांची नावे काढुन महाराजांना दिली होती. त्यातूनच सुरत तुटीतून एवढा ऐवज स्वराज्यात दाखल झाला होता.

‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ हे आपण अनेकवेळा ऐकले असेलच पण अफजलखान भेटीस जाताना शिवाजी महाराजांनी आपल्या तीन अंगरक्षकांना संरक्षणास ठेवले होते त्यात शिवाजी महाराज यांचा अंगरक्षक सिद्दी इब्राहीम सुद्धा होते. त्यांच्या अंगरक्षकांमध्ये मुस्लीम धर्मीय लोक होते यावरूनच शिवाजी महाराज यांचा सर्वधर्मीयांवर असलेला विश्वास दिसुन येतो. यात एक भर म्हणजे अफजलखानाला मारल्यानंतर अफजलखानाचा वकील/सल्लागार कृष्णमुर्ती भास्कर कुलकर्णी याने महाराजांवर तलवार चालवली होती.

Mir mohammad shivaji painting
मीर मोहम्मद यांनी १७ व्या दशकात रेखाटलेले शिवरायांबरोबर मुस्लीम सरदारांचे चित्र

शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील मुस्लीम सरदार

सिद्दी हिलाल: घोड दलाचा सेनापती
दर्यासारंग: नौसेनेचा प्रमुख
दौलत खान: आरमार प्रमुख
इब्राहीम खान: शस्त्रगार प्रमुख
काझी हैदर: महाराजांचे वकील
सिद्दी इब्राहीम: महाराजांचा अंगरक्षक
सिद्दी वाहवह: घोडदलातील सरदार
नूरखान बेग: स्वराज्याचा पहिला सरनौबत
श्यामाद खान: आरमाराचा अधिकारी
हस्सन खान मियानी: लष्करातील अधिकारी
सुलतान खान: आरमाराचा अधिकारी
दाउद खान: आरमाराचा सुभेदार
मदारी मेहतर: विश्वासू सेवक

असे अनेक मुस्लीम धर्मीय लोक शिवरायांच्या सैन्यात स्वराज्य प्रस्थापित करण्यासाठी लढत होती.

सुरत लुटीवेळी शिवाजी महाराजांनी सुरत मधील मश्जीद, चर्च वर हल्ला न करण्याचे फर्मान काढले होते.

शिवाजी महाराजांनी राजधानी रायगडमध्ये पुजेसाठी जेव्हा जगदीश्वर मंदिराची उभारणी केली त्याचवेळी आपल्या महालाच्या समोर मुस्लीम बांधवांसाठी मशीद तयार केल्याची इतिहासात नोंद आहे.

आपण फक्त कल्याणच्या सुभेदारच्या सुनेला आदरातिथ्याने सन्मानाने वागवलेले ऐकले असेल परंतु शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला कोणत्याही परिस्थितीत मुस्लीम महिला आणि लहान मुलांबरोबर गैरवर्तणूक व्हायला नको असे स्पष्ट आदेश दिले होते.
जर कुणाला कुराणाची प्रत मिळाली, तर त्याला पूर्ण सन्मान देत मुस्लिमांना ती परत करण्याचा आदेश शिवरायांनी आपल्या सैन्याला दिला होता.
ब्रिटिशांनी इतिहासलेखनाला जाणूनबुजून धार्मिक रंग दिला असल्याने लोकांनी त्यावरच विश्वास ठेवत महाराजांना धर्मावर आधारित लढणारा राजा म्हणून घोषित करून टाकले.
परंतु शिवरायांचा मुख्य उद्देश हा स्वराज्य प्रस्थापित करत प्रजाहितदक्ष राज्य तयार करणे हाच होता.

Reference:
New History of Maratha: सरदेसाई
शिवाजी कोण होता: गोविंद पानसरे
शिवाजी महाराजांचे मुस्लिम शिलेदार: राम पुनियानी

लेखन मांडणी : शुभम साळुंखे

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

ऐतिहासिक वाचण्यासाठी:

शिवजयंती सोहळा: शिवराय आणि त्यांचे आधुनिक मावळे

ज्ञानकोविंद शंभूराजे आणि छत्रपती परिवार

संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.