“अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख १९ फेब्रुवारी ही राज्य सरकारने केव्हाच निश्चित केलेली आहे. इतिहास संशोधक समिती नेमून त्यावर अभ्यास करून सरकारने याआधीच १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख शिवाजी महाराज यांची जन्मतारीख म्हणून निश्चित केलेली आहे, परंतु शिवसेनेची काही मंडळी शिवजयंतीच्या मुद्यावर पुन्हा घोळ घालत मराठी अस्मिता बिघडवत आहेत, असे नीतेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले.
विधिमंडळात सरकारने तिथीनुसार शिवजयंती करावी, अशी मागणी भाजप सदस्य सुरेश हळवणकर यांनी केली होती.
छत्रपती शिवाजीराजांचा जन्म 1627 ला झाला असे सांगणे केवळ निषेधार्हच नाही तर बदनामीकारक देखील आहे,19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला,असे इतिहासकार वा.सी.बेंद्रे त्यांच्या अत्यंत महत्वाच्या ग्रंथात संदर्भासह मांडतात. pic.twitter.com/Xqnz4buDcO
— nitesh rane (@NiteshNRane) December 16, 2017
संपूर्ण देशात १९ फेब्रुवारी ला शिवजयंती साजरी होत असताना शिवसेना दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी करते. यावर आक्षेप घेत नीतेश राणे यांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे.
शिवसेनेच्या मंडळींना तिथीचे एवढे वेड असेल तर ते स्वत:चे वाढदिवस, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तिथीनुसार साजरी करणार का?”, असा थेट प्रश्न आमदार नीतेश राणे यांनी शनिवारी उपस्थित करत शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान कार्यालयात राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेने शिवजयंती मध्ये घातलेल्या घोळावर थेट प्रश्न उपस्थित करत शिवसेनेची बोलती बंद केली आहे. शिवसेना यावर काय प्रत्युत्तर देतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.