एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू

0
एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू

सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील प्रवाशांचा एकच हलकल्लोळ माजला

मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर  मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत.

आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास फूट ओव्हर ब्रिजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला.

त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे श्वास गुदमरुन आणि जखमी होऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये 18 पुरुष, तर चार महिलांचा समावेश आहे. 20 ते 25 जण जखमी असून त्यांच्यावर परळमधील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

अग्निशमन दलाचे जवान, महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. वाहतूक आणि प्रवाशांसाठी हा ब्रिज तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.

दुर्घटनेनंतर जखमी झालेल्या प्रवाशांना इतरांनी तातडीने मदत केली. जखमी आणि मृतांना मिळेल त्या वाहनांमधून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र केईएममध्ये दाखल करेपर्यंत 15 प्रवाशांनी प्राण सोडला होता.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रेल्वेमंत्री पियुष गोयल रेल्वेच्या नव्या टाईमटेबलच्या उद्घाटनासाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी मध्य रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्थानकावर ही दुर्घटना घडली आहे. मूळ मुंबईचे असलेले पियुष गोयल रेल्वेमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत आले आहेत. त्यानंतर त्यांचा लोकल प्रवास नियोजित होता.

दरम्यान, पियुष गोयल घटनास्थळाला भेट देणार असून रेल्वे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील एल्फिस्टन स्टेशन आणि मध्य रेल्वेवरील परेल स्टेशनला जोडणाऱ्या पुलावर प्रवाशांसाठी अरुंद वाट असल्यामुळे कायम गर्दी होते. त्यातच पाऊस आल्यामुळे एका प्रवाशाचा पाय घसरला आणि धावपळीत असलेले अनेक जण चेंगरले गेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं, तर एकाला दम्याचा अटॅक आल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे.

 

एल्फिन्स्टन- परेल पुलावर नेमकं काय घडलं?

• सकाळी 9.30 च्या सुमारास पावसाची मोठी सर आली.

• त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या.

• त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलावर गर्दी झाली.

• त्याचवेळी पत्रा कोसळल्याचं सांगण्यात आलं.

• गर्दीच्या वेळी मोठा आवाज झाल्याने गैरसमजातून धावपळ सुरु झाली.

• ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले

• एकमेकांना तुडवत लोकांची धावपळ सुरु

• सकाळी 9.30 च्या वेळी थेट जखमी आणि मृतांचा आकडा समोर आला. तिघांचा मृत्यू.

• जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

• काही क्षणांत मृतांची संख्या 15 वर पोहोचली.

एल्फिन्स्टन-परेलला गर्दी का होते?

परेल आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांवर सकाळच्या वेळी कायमच प्रवाशांची गर्दी असते. अनेक ऑफिस या भागात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकरदार या भागात लोकलने येतात. गेल्या काही वर्षांत प्रवाशांची संख्या वाढलेली आहे, मात्र ब्रिजची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने काहीच प्रयत्न झालेले नाहीत.

उद्या दसरा असल्यामुळे अनेक जण खरेदीसाठी दादर आणि परिसरात जातात. सकाळच्या वेळेत असलेली गर्दी आणि त्यातच दोन्ही मार्गांवर लोकल आल्यास अचानक उडणारी झुंबड नेहमीची आहे. त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाल्याचं म्हटलं जात आहे.

प्रवाशांच्या तुलनेत ब्रिजची क्षमता कमी असल्यामुळे गर्दीच्या वेळी पुलावर ताण वाढतो, अशी ओरड नेहमीच प्रवाशांकडून होते. त्याकडे प्रशासनाकडून लक्ष न दिलं गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

दरम्यान, ब्रिज पडल्याच्या किंवा शॉर्ट सर्किटच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.

एलफिन्स्टन दुर्घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रतिक्रिया :

परळ-एलफिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची चौकशी करावी, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी:

 

 
News Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.