खरीप पिकांची धूळधाण व कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच..

0
खरीप पिकांची धूळधाण व कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच..

मराठवाड्यात यंदाही दुष्काळी स्थिती असून, आतापर्यंत पावसाच्या ७७पैकी केवळ २९ दिवस पाऊस झाला असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. कर्जमाफीची घोषणा झाली असली, तरी शेतकऱ्यांचे सातबारे मात्र अद्यापही कोरे झाले नाही. आता परभणी, बीड, लातूर, जालना, हिंगोली; तसेच उस्मानाबाद, नांदेड व औरंगाबादच्या काही भागांमध्ये खरिपाची पिके जळाली आहेत.

खरीप पिकांची धूळधाण व कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, सहा ते १३ ऑगस्ट या आठवड्याभरात तब्बल ३४ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही विभागात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची सख्या १२१पर्यंत पोचली आहे.

आठवडाभरात झालेल्या आत्महत्यांच्या प्रकरणामध्ये सर्वाधिक आठ आत्महत्या बीड जिल्ह्यातील असून, औरंगाबाद जिल्ह्यात दोन, जालना सहा, परभणी चार, हिंगोली एक, नांदेड पाच, लातूर चार, तर उस्मानाबाद जिल्ह्यात एका आठवड्यात चार शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. जून महिन्यांपासून कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी राज्यभर आंदोलने केली. सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी राज्यभर रान पेटवले. काही दिवसांत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत कर्जमाफीची घोषणा केली, तरीही मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी २५ जून रोजी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही आतापर्यंत जुलै महिन्यात ७७, तर ऑगस्ट महिन्यात ४४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

पैठण तालुक्यात साडेतीन हेक्टरची धुळधाण
औरंगाबाद जिल्ह्याती पैठण तालुक्यात सर्वाधिक साडेतीन हजार हेक्टवरील पिकांची धूळधाण झाली असून, या क्षेत्रावरील पिके मोडण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.

मराठवाड्याच्या परिस्थितीबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले की, विभागातील काही तालुक्यात परिस्थिती गंभीर आहे. प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून, प्रत्येक जिल्ह्यांकडून टंचाई सदृष्य परिस्थितीचा दररोज आढावा घेणे सुरू आहे. पावसाच्या या सर्व परिस्थितीचा अहवाल शासनाकडेही पाठवला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या पावसाने बराच फरक पडला अाहे. चांगल्या जमिनीवरील पिके तग धरून आहेत, मात्र मुरमाड, हलक्या जमिनीवरील पिके वाया गेली आहेत. मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात येत्या १९ ऑगस्टपासुन दमदार पावसाचा अंदाज आहे त्यामुळे येत्या काही दिवसात परिस्थिती निश्चित बदलेल, परतीचा पाऊस चांगला झाला तर पिण्याचा पाण्याला तसेच रबी पीकांसाठी त्याचा उपयोग होईल, असेही डॉ. भापकर यांनी सांगितले.

– आठ दिवसातील आत्महत्या ः ३४
– कर्जमाफीच्या घोषणेनंतर आत्महत्या ः १२१
– एक जानेवारीपासून ः ५८०
– ५० टक्‍क्यांपेक्षा कमी पाऊस ः १३२ मंडळे
– ५० ते ७५ टक्के पाऊस ः १८२ मंडळे
– ७५ टक्‍क्यांपेक्षा अधिक ः १०७ मंडळे.

 

यावर Twitter वर  प्रतिक्रिया येत आहेत .

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.