“माझा नवरा माझ्या प्रत्येक शैक्षणिक अॅचिव्हमेंटवर अक्षरश: आनंदाने नाचायचा ! आज मी लेफ्टनंट झालेय. हे पहायला तो असता तर खरंच खूप नाचला असता.”
…एबीपी माझावर मुलाखत सुरू होती. त्यावेळी शहिद कर्नल संतोषची पत्नी स्वाती हे म्हणाली !

तिचे वडील म्हणाले, “जावई संतोष शहिद झाल्यावर माझ्या मुलीला खूप जाॅब अपाॅर्च्युनिटीज घरी चालुन आल्या… पतंगराव कदमांनी भारती विद्यापीठात ‘डीन’ म्हणून नेमणूक करण्याचा प्रस्ताव ठेवला. शरद पवारसाहेबांनी विद्या प्रतिष्ठानमध्ये मोठे पद देऊ केले.. पण तिने एकच ध्यास घेतला होता – नवर्याचे स्वप्न पूर्ण करणे ! कुणा बापाला आपली मुलगी स्वत:पासून दूर ‘बाॅर्डर’वर राहिलेली आवडेल? पण तिचा निर्धार पाहून मी विचार केला, सगळे कधी ना कधी जाणारच आहेत. चांगले काम करून जाणे कधीही योग्यच. मग मी ही तिला ताकद दिली.”
तिची सासू , संतोषची आई म्हणाली , “माजा पोरगा गेला नाय.. त्यो हाय हितंच. माज्या सुनंनं त्येला जिवंत ठेवलंय त्येची वर्दी परत घरी आनून.”
…तिथे संतोषचा छोटा मुलगा बसला होता. सात वर्षांचा. गोड. आईला लष्कराच्या वर्दीत पाहून हरखलेला ! मुलाखतकर्तीने त्या मुलाला विचारले, ‘तुला मोठे झाल्यावर काय व्हायचंय…?’ आपल्याला यावर लहान मुलांची उत्तरं तोंडपाठ आहेत.
पण संतोषचा छोकरा एका सेकंदात उत्तरला “मला ‘शेतकरी’ व्हायचंय !!!”
अंगावर सरसरून काटा आला दोस्तांनो ! मुलाखत घेणारी पोरगी तर या अनपेक्षित उत्तराने आनंदाश्चर्याने किंचाळलीच !!
फेसबुकवर अनेक विचारवंत-बुद्धीवंत रोज घडणार्या फुटकळ घटनांवर ‘दांडगा धुमाकूळ’ घालतात. त्यात ‘मागासलेला समाज – पुढारलेला समाज’.. ‘तुमची जात – आमची जात’.. ‘पुरोगामी – सनातनी’ … ‘देशप्रेमी-देशद्रोही’.. ‘संवेदनशीलता-असंवेदनशीलता’.. ‘शेतकरी-नोकरदार’..’डावे-उजवे’ असे शब्द गोलगोल फिरवुन वापरतात. त्या सगळ्या शब्दांचा ‘अर्थ’ या चार मुलाखतींनी मला शिकवला !
नक्की कुठली घटना घेऊन फेसबुकवर अशा चर्चा व्हायला हव्यात याचे ‘भान’ आले..’विटाळ’ किंवा ‘सोवळे’ कसल्या घटनांचे हवे हे जाणवले. आणि पर्सनली ‘किरण माने’ म्हणून मी स्वत: ‘एक नवरा-एक बाप आणि एक मुलगा’ म्हणून कसं असायला हवं याबद्दलही अंतर्मुख झालो.
महाडिक आणि शेडगे परीवार … तुम्हालाही एक कडकडीत सलाम !
‘मराठा’ या शब्दाचा अर्थ ‘मराठी माणूस’ असा घेतला किंवा आपापल्या वकुबानुसार कुणी कसाही घेतला तरी या कुटूंबांमधला प्रत्येकजण खरोखरच ‘एक मराठा लाख मराठा’ अाहे !
आणि हो…आपल्या भारतमातेसाठी ‘शहिद’ झालेल्या संतोषच्या मुलाला आपल्या भारतमातेचा अन्नदाता ‘शेतकरी’ व्हायचंय , हे काहीतरी जबराट आहे भावांनो … खत्तरनाक… डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारं.. विचार करुया जमलं तर !
लेखक: किरण माने
©PuneriSpeaks
लेख आवडल्यास नक्की शेअर करा.
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
उरल काय आहे? True Love | मराठी लेख | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks
शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील १० विशेष गुण…
शिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks
“मातीत राबणारा आणि मातीसाठी प्राण पणाला लावणारा समाज ‘मागासलेला’ आणि आपली मुलं परदेशात चाकरीला पाठवण्यात अभिमान असणारा समाज ‘पुढारलेला’…”
अशी मतं असणार्या सोशल मिडीयावरील बुद्धीमान बिन्डोकांना सणसणीत चपराक आहे ही !