आताचे सरकार माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांचे राहिलेले नाही – अजित पवार

0
आताचे सरकार माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांचे राहिलेले नाही – अजित पवार

वर्धा : उदयोगपतींचे कर्ज माफ करणारे आणि विजय मल्ल्याला परदेशात पळण्यासाठी मदत करणारे हे सरकार माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांचे राहिलेले नाही. खऱ्या अर्थाने माझ्या शेतकऱ्यांना अडचणीत ढकलणारे हे भाजप सरकार असून, जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी वर्ध्यामधील सर्कस मैदानावर झालेल्या जबरदस्त सभेत सरकारला दिला.

अजित पवार यांनी या सभेत सरकारवर जबरदस्त आसूड ओढले. देवेंद्र फडणवीस सरकार आणि मोदी सरकाच्या कारभारावर आणि निर्णयावर हल्लाबोल केला. या दळभद्री सरकारच्याविरोधात म्हणूनच हल्लाबोल पदयात्रा सुरु केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारला तीन वर्ष झाली अजुन किती महिने, कितीवेळ थांबायचे, किती कुटुंब उध्वस्त करणार, ३०२ कलमाचा गुन्हा कुणावर दाखल करणार असा संतप्त सवाल केला. शाहू, फुले, आंबेडकरांच्या राज्यामध्ये ६५ हजार कुपोषित मुले मृत्यूमुखी पडली आहेत. यांना कळत नाही त्यांना पोषण आहार दयायचा असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला.

शरद पवारांनी स्त्रियांना न्याय,सन्मान मिळवून दिला परंतु आत्ताचे सरकार महिलांना न्याय ना सन्मान देत आहे. कोपर्डी प्रकरणातील नराधमांना आत्ता कुठे फाशी जाहीर झाली. परंतु जनतेला वाटत आहे की त्या नराधमांना भरचौकामध्ये फाशी दयायला हवी जेणेकरुन अशा घटना घडणार नाही. या जनतेच्या भावनांचा विचार सरकार करणार आहे की नाही. गोरगरीबांची मुले शिकली पाहिजेत हे आमच्या सरकारच्या काळामध्ये धोरण होते. ५०० कोटीच्या शिष्यवृत्या देत होते. पण आज शिष्यवृत्या मिळत नाहीय. राज्यातील १५०० शाळा बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. आमच्या ग्रामीण भागातील गरीब मुलांनी शिकू नये असा प्रयत्न सरकार करत आहे.

राज्यात आज कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. दिवसाढवळया हत्या होत आहेत. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. राज्यसरकारची पकड प्रशासनावर राहिलेली नाही. काय करतेय सरकार, याला कोण जबाबदार, कोण राजीनामा देणार असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अजित पवार यांनी सभेत विचारला.

या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख,माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार ख्याजा बेग, आमदार शशिकांत शिंदे, आमदार विदया चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार संदीप बजोरिया, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार गणेश दुधगावकर, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बालबुधे, माजी आमदार राजु निमांडे, माजी आमदार वसंत कार्लेकर, प्रदेश सरचिटणीस किशोर मायनकर, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, आदींसह वर्धा, यवतमाळ जिल्हयातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.