पावसाळ्यात वीज चमकत असताना घ्यावयाची काळजी
वीज एका ठिकाणी फक्त एकाच वेळेस पडते- हा एक गैरसमज असून वीज अनेक ठिकाणी अनेक वेळेस पडू शकते.
वीज कोसळल्याने प्रभावित व्यक्ती त्वरित मरण पावतो- हा समज चुकीचा असून वीज प्रभावित व्यक्तींचे मृत्यूचे प्रमाण हे फक्त 10 ते 30% आहे. वीज प्रभावित व्यक्तीस त्वरित प्रथमोपचार दिल्यास आपण त्याचे प्राण वाचवू शकतो. वीज प्रभावित व्यक्तीच्या अंगात विद्युत भार (करंट) असतो व त्यास स्पर्श करणे धोकादायक असते. हा एक चुकीचा समज असून वीज प्रभावित व्यक्तीस स्पर्श करणे धोकादायक नसते.
दुचाकी वाहनावर वीज पडत नाही कारण त्याचे चाक रबराचे असते- हा सुद्धा गैरसमज असून दुचाकी वाहन चालवत असताना वीज पडून मृत्यू पावण्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत.
आकाशात विजा चमकत असताना घ्यावयाची खबरदारी
– शेतात काम करीत असताना शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्यावा.
– शेतातील सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा.
– पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.
– ओल्या शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तत्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे.
– पोहणारे, मच्छिमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर यावे.
– झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे.
– एखादे उंच झाड (जसे शेतातील बैठकीचे झाड) सुरक्षित ठेवायचे असल्यास, वृक्षाच्या उंच फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे.
– पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपल्या घरावर वीज वाहक यंत्रणा बसवावी.
– आपले घर, शेत इत्यादींच्या जवळपास कमी उंचीची झाडे लावावीत.
– जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा.
– वृक्ष, दलदलीचे ठिकाण तथा पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहा.
– मोकळ्या आकाशाखाली असण्यापेक्षा एखाद्या छोट्या (कमी उंचीच्या) झाडाखाली आसरा घ्यावा.
– असे शक्य नसल्यास जमिनीपासून खालील खोलगट ठिकाणी आधी सांगितलेल्या (क्र.१) पद्धतींनी गुडघ्यात वाकून बसा. जर आधीच खोलगट भागात असाल तर वरती येवू नका.
– चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच रहावे.
आकाशात विजा चमकत असताना खालील गोष्टी टाळा
– खुल्या मैदानात उभे राहू नका. विजा सर्वात जास्त खुल्या मैदानात पडतात.
– झाडाखाली उभे राहू नका. उंच ठिकाणी, झाडावर चढू नका.
– विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादीजवळ उभे राहू नका.
– गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपण घालू नका, कारण ते विजेला आकर्षित करते.
– दोन चाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा. अशावेळी वाहनातून प्रवास करू नका.
– वाहनाच्या बाहेर थांबणे फारच आवश्यक असल्यास धातूचे कोणतेही उपकरण बाळगू नका.
– एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तीमध्ये किमान १५ फूट अंतर राहील याची काळजी घ्या.
– धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका.
– पाण्याचा नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका, शिवाय त्यापासून दूर रहा.
– विजेवर चालणारे यंत्र तसेच धातूपासून बनलेल्या वस्तू जसे कृषी यंत्र इत्यादीपासून दूर रहा.
प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दूरध्वनीचा वापर करू नका. मोबाईलचा वापर टाळा.
आकाशात विज चमकत असताना जीव वाचवणारा नियम
विजेचा प्रकाश आणि आवाज यात 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल तर तुम्हाला विजेपासून धोका आहे. अशावेळी तुमच्यावर वीज पडण्याची शक्यता 80% आहे. वीज तुमच्या आसपासच्या पाच किमी अंतरावर पडत आहे, अशा वेळेस सुरक्षित जागेचा आसरा घ्या. शेवटचा गडगडाट ऐकल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटांनी घराच्या बाहेर पडावे.
तर अशाप्रकारे तुम्ही आकाशात वीजा चमकत असताना आपला जीव वाचवू शकता, ही माहिती सर्वांना समजण्यासाठी पोस्ट जास्तीत जास्त लोकांना शेअर करा?
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.