पहिल्या महिला मराठा सेनापती उमाबाई दाभाडे (Umabai Dabhade)
……
मराठा सैन्यातील पहिल्या महिला सेनापती उमाबाई दाभाडे Umabai Dabhade यांचा उज्वल इतिहास आज आपण पडताळून पाहुयात
Umabai Dabhade उमाबाई दाभाडे
हिंदवी स्वराज्यासाठी अनेक मराठा घराण्यांनी बलिदान दिले. त्यामध्ये सेनापती दाभाड्यांच्या घराण्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. दाभाडे घराणे मुळचे गुजरातमधील डभई चे. या घराण्यातील बजाजी दाभाडे गुजरातमधून महाराष्ट्रात आले. त्यांचे पुत्र यसाजी हे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते.
शिवाजी महाराजांच्या जवळच्या विश्वासू लोकांपैकी ते एक होते…येसाजी दाभाड्यांना खंडेराव व शिवाजी असे दोन पुत्र होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराजांबरोबर जिंजीच्या प्रवासात येसाजी, खंडेराव व शिवाजी हे तिघे होते. सन १६९७ च्या अखेरीस राजाराम महाराज परत निघाले असता, मुघल झुल्फिकार खानने जिंजीस वेढा घातला. राजाराम महाराज येसाजी व दाभाडेबंधूसोबत बाहेर पडले. मुघल त्यांचा पाठलाग करीत होते. खंडेराव व शिवाजी दाभाडे यांनी राजाराम महाराजांना सुरक्षित स्थळी आणले; पण वाटचालीतील दगदगीमुळे शिवाजी दाभाडे मरण पावले.
खंडेरावांना वेळोवेळी अनेक इनामे व वतने मिळाली. त्यांना एकूण १३ गावांची सरपाटीलकी म्हणजे जवळ जवळ ७०० गावांची देशमूखी मिळाली. याखेरीज पाटील, देशमुख, राजदेशमुख, सरदेशमुख, सरदेश कुलकर्णी, अठरा कारखान्याचे हवालदार, इनामदार, मोकासदार, सेनाखासखेल वगैरे हुद्देही त्यांच्याकडे होते.
पुढे ११ जानेवारी १७१७ रोजी छत्रपती शाहुमहाराज यांनी खंडेराव दाभाडे यांची नेमणूक मराठा सम्राजाच्या ‘सेनापती’ पदावर केली. याच सेनापती खंडेराव दाभाडे यांच्या उमाबाईसाहेब या पत्नी होत.
उमाबाई दाभाडे अत्यंत कर्तबगार , हुशार, शूर व जिद्दी होत्या त्या खानदेशातील अभोणकर देवराव ठोके देशमुख यांच्या कन्या होत.
Umabai Dabhade History उमाबाई दाभाडे इतिहास
लहानपणीच उमाबाईंनी घोड्यावर बसणे व तलवार चालवण्याचे शिक्षण घेतले. बालपणी एक दिवस करवीर संस्थानाच्या संस्थापिका ताराराणी यांच्या दागिन्याच्या डब्यातून त्याचे सोन्याचे तोडे उमाबाईंनी स्वतःच्या पायात घातले. हे पाहताच त्यांचे सासरे येसाजींनी त्यांना ताबडतोब काढून ठेवण्यास सांगितले. सोन्याचे तोडे घालण्याचा मान फक्त राजघराण्यातील स्त्रियांना असतो. तो दाभाड्यांना नाही असे समजाविले. जिद्दी स्वभावामुळे आपणही हा मान मिळवायचा, असे स्वप्न उमाबाईंनी बाळगले.
पुढे एका ज्योतिषाने पायात सोन्याचे तोडे घालतील; पण लोखंडाच्या साखळ्याही घालतील, असे भाकित केले व ते खरेही ठरले. खंडेराव व उमाबाई यांना त्रिबकराव, यशवंतराव व बाबुराव अशी तिन मुले होती. १७२९ मध्ये खंडेरावांचे निधन झाले. त्यांचे थोरले पूत्र त्रिंबकराव सेनापती झाले.
त्रिंबकराव व बाजीराव पेशवे यांच्यात चौथाईवरून वाद होता. गुजरातेत बडोद्यानजिक उभईयेथे १ एप्रिल १७३१ रोजी बोलाचाली व वाटाघाटी सुरू असता दोघामध्ये युद्ध सुरू झाले व त्रिंबकरावांचा त्यात अंत झाला. हे उमाबाईंना कळताच त्या रागाने चवताळून उठल्या व त्यांनी बाजीरावाच्या कृत्याचा सूड घेण्याचे ठरविले. त्या मागे लागताच बाजीराव छत्रपती शाहू महाराजांच्या आश्रयास गेले.
बाजीरावांना घेऊन शाहूमहाराज तळेगावास गेले व उमाबाईंचे सात्वन करून बाजीरावांना त्यांच्या पायावर घालून उमाबाईंचा राग शांत केला. यावेळी शाहूमहाराजांनी उमाबाईंना शुभचिन्ह म्हणून सोन्याचे सूर्यफूल दिले.
१७३२ मध्ये अहमदाबादेवर जोरावरखान नावाचा मोघल सरदार चाल करून आला. शाहु महाराजांनी उमाबाईंना त्याचे पारिपत्य करण्यासाठी अहमदाबादेस पाठविले. मराठी सैन्य अहमदाबादेस पोहोचले.
या सैन्याची सेनापती एक स्त्री आहे हे पाहून जोरावरखानाने उमाबाईंना एक पत्र लिहिले…,
‘तू एक विधवा आहेस, तुला लहान मुले आहेत. आम्ही तुला हरविले तर तुझ्या मुलांचा सांभाळ कोण करणार ?
आमच्या वाटेला येऊ नकोस. ज्या रस्त्याने आली आहेस त्याच रस्त्याने परत जा.’ हे पत्र वाचून उमाबाईंनी ठरविले, की लढाई जिंकुनच परत येईन. अहमदाबादच्या किल्याबाहेरच युद्ध सुरू झाले. पांढरा शुभ्र पेहराव परिधान केलेल्या उमाबाई प्रचंड सैन्याच्या गदारोळात रणांगणाच्या मध्यभागी हत्तीवर बसून लढत होत्या. त्यांच्याजवळ निरनिराळी शस्त्रे होती.
जोरावरखानाच्या प्रचंड सैन्याचा मावळ्यांच्या सहकार्यांने त्यांनी धुव्वा उडविला. हे पाहून जोरावरखान किल्याच्या आत जाऊन लपून बसला. किल्याचे दरवाजे आतून बंद केले. Umabai Dabhade दरवाजाच्या आत शिरायचे कसे हा प्रश्न पडला. तेंव्हा शत्रूच्या सैन्यातील मृतदेहाचे ढीग दरवाजाला लावून, एकावर एक रचून पेटवून दिले.
दरवाजा पडला व मराठा सैन्य आत शिरले. जोरावरखानला जेरबंद करून सा साताऱ्यास तळेगावी परतल्या.
अहमदाबादेतील शौर्यावर खूश होऊन छत्रपती शाहू महाराज हे उमाबाईंचा गौरव करण्यास तळेगावी आले. तळेगावात मोठा दरबार भरवण्यात आला. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना पांढरा शालू, पांढरी शाल, दाणेदार सोन्याच्या पाटल्या आणि खास तयार केलेले सोन्याचे तोडे सन्मानाने दिले. लहानपणी सोन्याचे तोडे घालण्याचे उमाबाईंचे स्वप्न पूर्ण झाले. त्या वेळेपासून वंशपरंपरेने तळेगावच्या सेनापती घराण्याला पायात सोन्याचे तोडे घालण्याचा मान मिळाला.
१७५१ मध्ये पेशव्यांनी दाभाड्यांना पुण्यात नजरकैदेत ठेवले होते. उमाबाईंनाही नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यातली काही मंडळी १६ नोव्हेंबर १७५१ ला कैदेतून पळाली, तेंव्हा उमाबाई व त्यांची सून अंबिका बाई यांना सिंहगडावर कैदेत ठेवले.
१४ फेब्रुवारी १७५२ ला उमाबाईंना पुण्यात आणण्यात आले.
शनिवारवाड्यानजिक ओंकारेश्वराजवळ नडगेमोडी येथे त्या राहिल्या. याच डेर्यात असताना २८ नोव्हेंबर १७५३ रोजी उमाबाईंचे निधन झाले. अशाप्रकारे मराठा साम्राज्याच्या पहिल्या महिला सेनापतीने जगाचा निरोप घेतला. इतिहास त्यांच्या शौर्याला कदापि विसरणार नाही.
लेखक :
सत्यशीलराजे दाभाडे, पुणे
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
जाधवगड किल्ला इतिहास: जाधवगड किल्ला की वाडा?
शिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय? शिवगर्जना
शिवाजी महाराज बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा द्यायचे? चौरंग शिक्षा म्हणजे काय?