विदर्भ-मराठवाडा: हवामान खात्याच्या अंदाज म्हणजे आता विश्वासाचा राहिला नाही. वारंवार चुकीची माहिती भेटत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
नुकतेच पुन्हा एकदा असे घडले असुन २० फेब्रुवारीला हवामान खात्याने वादळासह गारपिटीचा अंदाज दिला होता. या अंदाजावर शेतकऱ्यांच्या वर्षाचे कष्ट वाया जाणार म्हणून त्यांनी द्राक्षे आणि संत्री यांची अवेळी तोडणी केली. गारपिटीने संपूर्ण नुकसान होण्यापेक्षा आपला काहीतरी माल वाचेल या विश्वासाने शेतकऱ्यांनी आपल्या फळांची तोडणी केली.
परंतु हवामान खात्याने आपला अंदाज वारंवार बदलत शेवटी गारपीट होणारच नाही असा अंदाज काढल्याने शेतकऱ्यांनी डोक्याला हात लावले. आधी झालेल्या गारपिटीने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा गारपीट होऊन नुकसान होण्यापेक्षा लागणीचे पैसे तरी निघतील या आशेने तोडणी केली आणि शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टाचे पाणी झाले आहे.
हवामान खात्याचा अंदाज
२० फेब्रुवारी: हवामान खात्याने अंदाज जाहीर केला. या अंदाजात त्यांनी २३ फेब्रुवारीला उत्तर-मध्य महाराष्ट्रात वादळासह गारपीट होईल, असा इशारा देण्यात आला.
२१ फेब्रुवारी: या अंदाजात त्यांनी २३ फेब्रुवारीला उत्तर मध्य महाराष्ट्रात तर वादळासह गारपीट होईलच, पण सोबतच २४ व २५ फेब्रुवारला विदर्भ, मराठवाडा देखील गारपिटीच्या तडाख्यात येईल, असे सांगितले
२२ फेब्रुवारी: या दिवशीच्या अंदाजात त्यांच्या हवामान अंदाजात काहीच बदल नव्हता, पण २६ फेब्रुवारीलासुद्धा गारपीट होईल असे सांगण्यात आले.
२२ फेब्रुवारी सायंकाळ: पुन्हा एक हवामान अंदाज जाहीर केला. यात त्यांनी २३ फेब्रुवारीला कुठेही वादळी गारपीट होणार नाही, पण २४ फेब्रुवारीला मात्र उत्तर-मध्य, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होईल असे सांगितले. या अंदाजात त्यांनी २५ आणि २६ फेब्रुवारीचा हवामानाचा अंदाज गाळला.
२३ फेब्रुवारी: सगळ्या अंदाजाला खोटे ठरवत त्यांनी नवीन अंदाज दिला आणि यात त्यांनी कुठेही गारपीट होणार नाही, असे सांगितले.
या सर्व खेळात बिचारे शेतकरी मात्र पुरते गोंधळून गेले. भीतीपायी अनेकांनी कच्ची फळे, पिके तोडून टाकली. यात गारपीट न झाल्याने शेतकऱ्यांना काडीचाही फायदा झाला नसून वेधशाळेविरुद्ध संतापाची लाट सर्वत्र पसरली आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर #खूनीसरकार हॅशटॅग वर लोकांनी विचारला सरकारला जाब