पिंपरी-चिंचवड चे माजी महापौर आणि विद्यमान विरोधी पक्षनेते योगेश बहल नुकतेच मुंबई महापुराच्या तडाख्यातून बचावले असल्याचे सांगितले.
परवा-परवाचा पाऊस म्हणजे २६ जुलै २००५ साली झालेल्या अतिवृष्टीची आठवण करून देणारा होता. त्यावेळी जवळपास १०९४ लोकं मृत्युमुखी पडले होते. अशीच काहीशी अवस्था २९ ऑगस्ट ला झाली होती. संपूर्ण मुंबापुरी पाण्याखाली गेलेली होती. लोकं कशीबशी पाण्यातून वाट काढत घरी जात होती.
अशातच पिंपरी-चिंचवड चे माजी महापौर योगेश बहल हे सुद्धा मुंबईच्या पावसात अडकून पडले होते आणि सुदैवाने ते बचावले.

यशस्वी बांधकाम व्यावसायिक आणि उत्तम नेता म्हणून प्रसिद्ध असलेले योगेश बहल हे व्यावसायिक कामानिमित्त मुंबईला गेले होते. “आय टी सी मराठा” या तारांकित हॉटेल मधून बैठक उरकून ते दुपारी अडीचच्या दरम्यात पुण्याला यायला निघाले. पण मुंबईत दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने त्यांची वाट अडवली. वाटेतच कमरेएवढ्या पाण्यात ते अडकून पडले. त्यांच्या उंच अशा “लँड क्रुझर” गाडीमुळे ते पाण्यातून बचावले. आजूबाजूला पाण्यातून वाहून जाणाऱ्या दुचाकी गाड्या पाहून त्यांचे मन धास्तावले होते. अशा विदारक अनुभवातून ते कसेबसे अंधेरी (पूर्व) MIDC कार्यालयापाशी पोहचले आणि तिथून काट्याची शर्यत पार करत द्रुतगती मार्गावर पोहचले. जास्तीत-जास्त तीन तास लागणाऱ्या प्रवासाला तब्बल १३ तास लागले आणि शेवटी ते पहाटे साडेतीन वाजता घरी पोहचले.
या थरारक अनुभवाची घडलेली प्रचिती त्यांनी खुद्द विस्ताराने सांगितली. अशा महापुराच्या विदारक अनुभवला पहिल्यांदा सामोरे गेल्याचे ते बोलले आणि आता त्यातून सावरलो असल्याचे सांगितले.